कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये कराड दक्षिणेत तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचा समावेश आहे. तीनपैकी दोन ठिकाणी उंडाळकर गट तर एका ठिकाणी भोसले गटाला विजय मिळाला. तर कराड उत्तरेत दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला.
कोळेत पोटनिवडणुकीतील विजयाने एकहाती उंडाळकर गटाची सत्ता
कोळे येथे अतुल भोसले गटाकडून निवडूण आलेले प्रदिप पाटील यांचे निधन झाल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागलेली होती. यामध्ये भोसले गटाकडे असलेल्या या जागेवर पोटनिवडणुकीत उंडाळकर गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे आता सर्वच्या सर्व जागा उंडाळकर गटाकडे असून एकहाती सत्ता आहे. पोटनिवडणुकीत उंडाळकर गटाचे श्रीकृष्ण आनंदराव पाटील यांना 397 तर भोसले गटाचे संपत दिनकर पाटील यांना 297 मते मिळाली. त्यामुळे उंडाळकर गटाचे श्रीकृष्ण पाटील 102 मतांनी विजयी झाले आहेत. पोटनिवडणूकीला एकूण 695 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 3 मते ही नोटाला मिळाली आहेत.
अकाईचीवाडीत उंडाळकर गटाचे बाळू शेवाळे विजयी
अकाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत उंडाळकर गटाला यश मिळाले आहे. बाळू विठू शेवाळे 202 मते तर मानसिंग तानाजी चिकाटे यांना 167 मते मिळाली. त्यामुळे येथे बाळू शेवाळे 35 मतांनी विजयी झाले. पोटनिवडणूकीला एकूण 371 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 2 मते ही नोटाला मिळाली आहेत.
तुळसणला भोसले गटाचे सर्जेराव वीर विजयी
कराड तालुक्यातील तुळसण ग्रामपंचायतीची यापूर्वीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केलेली होती. मात्र बाबासो वीर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत निवडणूक लागली. यामध्ये अतुल भोसले गटाचे सर्जेराव पांडुरंग वीर यांना 266 तर विरोधी गटाचे सुरेश यशवंतराव माने यांना 166 मते मिळाली. त्यामुळे भोसले गटाचे सर्जेराव वीर हे 100 मतांनी विजयी झाले. पोटनिवडणूकीला एकूण 437 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 5 मते ही नोटाला मिळाली आहेत. विजयी उमेदवार सर्जेराव वीर हे पूर्वीचे सदस्य असलेले बाबासो वीर यांचे चुलते आहेत. त्यामुळे पुतण्याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर चुलत्यांनी विजय मिळविला.
कराड उत्तर मतदार संघात दोन ठिकाणी पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी विजयी
कालगांवला प्रदीप चव्हाण विजयी
कालगांव ग्रामपंचायतीत पोटनिवडणूकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदीप सर्जेराव चव्हाण यांना 294 तर विरोधी उमेदवार युवराज आनंदराव चव्हाण यांना 124 मते मिळाली आहेत. त्यामुळे पालकमंत्री यांच्या गटाचे प्रदीप चव्हाण हे तब्बल 170 मतांनी विजयी झाले. पोटनिवडणूकीला एकूण 423 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 5 मते ही नोटाला मिळाली आहेत.
भवानवाडीत वैशाली यादव विजयी
भवानवाडी येथे ग्रामपंचायतीत पोटनिवडणूकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे वैशाली विनोद यादव यांना 108 विरोधी उमेदवार दिपाली नंदकुमार माने यांना 73 तर मंगल अजित काळे यांना 69 मते मिळाली आहेत. त्यामुळे वैशाली यादव या 35 मतांनी विजयी झाले. पोटनिवडणूकीला एकूण 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 2 मते ही नोटाला मिळाली आहेत.