हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत देखील महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या नांदेडमधील एक गाव चांगलेच चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मुतण्याळ या गावातील प्रतिस्पर्धी गटांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकाल पाहायला या गावात कोणीही उरलेले नाही.ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर मुतण्याळ गाव आता रिकामे झाले आहे.
बिलोली तालुक्यातील मुतण्याळ या गावात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी वादावादी झाली. त्यानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाली. या हाणामारीत अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. सध्या पोलिसांनी या गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. हाणामारी करणाऱ्या 38 जणांना पोलिसांनी अटक केली. तर अटकेच्या भीतीने काही लोक गावातून पसार झाले आहेत.
तसेच पोलिसांकडून या हाणामारीत सहभागी असलेल्या आरोपांची कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सध्या बिलोली तालुक्यात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात आणखीनच वाढ केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’