कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्यभर पुढे पुढे करणारे मंत्री शंभूराज देसाई देशात दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप करतात. शंभूराज देसाई यांचे आजोबा थोर होते; पण हे चोर निघाले, अशी जहरी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केले
येथील श्रीमंत रणजीतसिंह पाटणकर स्मारक मंदिरात आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हा प्रमुख रवी पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील, चिपळूण तालुका प्रमुख संदीप सावंत, सचिन आचरे, गौरव परदेशी, दादा पानस्कर, भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
भास्कर जाधव म्हणाले, “शंभूराज देसाई यांची ओळख चोरवाटा दाखवणारा, अशी महाराष्ट्रात झाली आहे. थोर महापुरुषांची बदनामी करून राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे प्रश्न संपले का, तर नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने संस्कृती लोकशाही व समाज व्यवस्था बिघडण्याची सुपारी घेतली आहे. सत्तेची मस्ती दहशत या जोरावर खाजगीकरण आणि राजकीय पक्ष संपवण्यासाठी कुटील डाव केले जात आहेत.
पाटणच्या जनतेचा शंभूराज देसाईंनी विश्वासघात केला
पाटणचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांचे अलीकडचे बोलणे जमिनीवरून दिसत नाही. हेच शंभूराज देसाई त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ऋणातून मी कसा उतराई होऊ असे म्हणाले होते. आज मात्र त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाटणची जनता वेळ आल्यावर त्यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते, माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला.