हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायजेरिया नंतर आता ग्रीस मध्ये प्रवाशांची बोट पलटल्याची (Greece Boat Accident) दुर्दैवी घटना घडली आहे. घटना घडली त्यावेळी सदर बोटीत तब्बल 400 प्रवाशी होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला आहे तर बरेच लोक अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र या अपघाताने संपूर्ण ग्रीस हादरले आहे.
इटलीला जाणारी ही बोट लिबियाच्या पूर्वेकडील टोब्रुक भागातून निघाली होती असे समजते.आत्तापर्यंत या दुर्घटनेतील 104 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये 30 इजिप्शियन, 10 पाकिस्तान, 35 सीरिया आणि दोन पॅलेस्टिनी नागरिकांचा समावेश आहे. या सर्व प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात नेमके कितीजण बेपत्ता आहेत याचा अचूक एकदा अद्याप तरी समोर आलेला नाही.
या भीषण घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. नौदलाचे जहाज, लष्कराचे वाहतूक विमान, हवाई दलाचे हेलिकॉप्टर तसेच तटरक्षक दलाच्या ६ जहाजांच्या मदतीने प्रयत्नांची शर्थ सुरु आहे. काल संध्याकाळी अंधार पडल्यामुळे बचावकार्यात खंड पडला, मात्र आज सकाळ पासून पुन्हा एकदा बचावकार्य वेगाने सुरु आहे.