हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतलं आणि त्यांना अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्या सोबत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, रयत संस्थेचेचे चेअरमन अनिल पाटील, विश्वजीत कदम देखील उपस्थित होते.
दरवर्षी या दिवशी शरद पवार साताऱ्यात येऊन कर्मवीरांना अभिवादन करत असतात. यंदाही त्यांनी ही परंपरा जमली आहे. शरद पवार हे कालच साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं होते. आज सकाळीच त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केलं. यानंतर ते रयत शिक्षण संस्थेमध्ये भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावतील. या कार्यक्रमानंतर ११ वाजता रयत शिक्षण संस्थेची वार्षिक मीटिंग पार पडणार आहे. त्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कराडमधील काले गावात सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. देशातील गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाऊराव पाटील यांनी अनेक शाळा उभारल्या, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहांची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं ९ मे १९५९ रोजी निधन झालं.