हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात एका स्वयंपाक्याच्या कानशीलात जोरदार लगावलीय. कोरोना रूग्णांच्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर झाल्याचं लक्षात आल्यावर कडू यांचा पार चढला आणि त्यांनी ही मारहाण केली. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे ओळखले जातात त्यांच्या आंदोलनासाठी अन आक्रमक अंदाजासाठी.. अनेकांना बच्चू कडू यांच्या मारहाणीच्या प्रसादाचा अनुभवही अनेकदा आलाय. मंत्री झाल्यावर काहीसे हरवलेले बच्चू कडूंचा रुद्रावतार काल अकोल्यात पहायला मिळाला. बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील मेसला भेट दिलीय. यावेळी कडू यांना मेसमधील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचं लक्षात आलं. त्यातूनच बच्चू कडू यांनी त्या स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली.
याबाबत सविस्तर वृत्त असं कि, एका वृत्तपत्राने वृत्त दिल्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची झडाझडती घेतली. सर्वप्रथम मेसमध्ये उपलब्ध धान्यसाठ्याची पाहणी केली. यावेळी उपलब्ध धान्यसाठ्याची नोंद कशा पद्धतीने केली जाते, याची पाहणी केली असता आठ महिन्यांच्या धान्य पुरवठ्याच्या नोंदीच झालेल्या नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारला असता त्यांना स्पष्ट सांगता न आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन या प्रकरणावर चौकशी बसविण्याच्या सूचना पालकमंत्री कडू यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना दिल्या. यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.