हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचयातीने महाराष्ट्रातील वेवजी गावात तब्बल दीड किमी इतकी घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वेवजी गावात घुसखोरी करत गुजरातने विजेचे पोल ठोकून अतिक्रमण करत गावातील रस्त्यांचे डांबरीकरणही सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, गुगल मॅपवर देखील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, संभा आणि आच्छाड गावे देखील गुजरातच्या हद्दीत गेल्याची दिसत आहेत. हा सर्व प्रकार माकपचे आमदार विनोद निकोले यांनी विधिमंडळात उघडकीस आणला आहे. यावेळी, “याप्रकरणी लवकर कारवाई करण्यात यावी नाहीतर संतापाची लाट उसळेल” असा इशारा देखील निकोले यांनी दिला आहे.
गुजरातने केलेल्या घुसकोरीबाबत वेवजी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल करून देखील यावर अद्याप कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेले नाही. शेवटी हा मुद्दा आता विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, गुगल मॅपने ही महाराष्ट्रातील काही गावे गुजरातच्या हद्दीत दाखवल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पालघर जिह्यातील तलासरी तालुका असून येथील वेवजी गावात गुजरातने दीड किलोमीटर इतकी घुसखोरी केली आहे. यावरच न थांबता गुजरातने गावातील पोलवर देखील अतिक्रमण केले आहे.
ग्रामपंचायतकडून गुजराती हद्द जिथून सुरू होते तेथेच “गुजरात राज्याची हद्द सुरू” असा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र बोर्ड असलेल्या जागेपासून पंधराशे मीटर आत गुजरातने स्ट्रीटलाईट बसवले आहेत. याप्रकरणी वेवजी गावात सर्वे केल्यानंतर हे गाव महाराष्ट्रातच असल्याचे उघडकीस झाले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल देखील गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीकडे आला आहे. परंतु ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचा दिसत आहे. त्यामुळे, त्वरीत महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमांची निश्चिती करावी, अशी मागणी सीमावर्ती ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी म्हणेजच कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी त्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे बराच काळ गावकऱ्यांना आपल्या घरातच राहण्याची वेळ आली. आणि याच काळात गुजरातने याचा फायदा घेत गावात घुसखोरी करण्यास सुरुवात केली. गुजरातने आता वेवजी गावात घुसखोरी करून रस्त्यावरच अडथळे उभारले आहेत. इतकेच नव्हे तर, जी मोजणी महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे ती बेकायदेशीर असल्याचा दावा गुजरात राज्य तहसीलदार प्रदीप झाकड यांनी केला आहे. तसेच, गुजरात ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून गावात बसवण्यात आलेले पोल काढून टाकण्यात आलेले नाहीत.
या सगळ्यात हा वाद विवाद सुरू असताना गुगलकडून देखील महाराष्ट्रातील काही गावे गुजरातच्या हद्दीत दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे आता थेट यांमध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून दोन्ही राज्यांच्या भूमिअभिलेख खात्यामार्फतच त्याचे सीमांकन निश्चित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. जर यावर त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर गुजरात महाराष्ट्रात आणखीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल असेही ग्रामपंचायत इकडून सांगण्यात आले आहे. आता हा मुद्दा विधिमंडळात उचलून धरल्यामुळे यावर लवकर काहीतरी मार्ग निघेल अशी आशा गावकऱ्यांना आहे.