हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठले. त्यांच्या या बंडखोरीबद्दल शिंदे गटाच्या नेत्यांनी आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचे म्हंटले होते. आता शिंदे गटाचे नेते, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. “आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
गुलाबराव पाटील यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही ज्यावेळी उठाव केला तेव्हा उठावासाठी आम्हाला 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता.
उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं. पण अशा प्रकारे मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो, असे पाटील यांनी म्हंटले. दरम्यान पाटील यांच्या टीकेनंतर आता शिवसेनेकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पहावे लागणार आहे.