हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच होईल असं विधान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच पंकजा मुंडे यांना शिवसेनेची ऑफर देणारा पहिला मीच होतो असा खुलासा देखील त्यांनी केला.
गुलाबराव पाटील म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी अडचणीच्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे असे गुलाबराव पाटील यांनी म्हंटल तसेच ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे व मुंडे परिवाराचे काम मोठे आहे. यामुळे मुंडेंचा वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना योग्य स्थान व प्रतिनिधीत्व शिवसेनेत मिळेल; अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहिल. प्रवेश केल्यानंतर त्यांना पद काय द्यायचे हे मुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ठरवतील; असे त्यांनी स्पष्ट केल.