साताऱ्यात पोहचताच गुणरत्न सदावर्तेंची घोषणा : भारत माता की जय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यावरून आज सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. सातारा पोलिसांच्या एका टीमने मुंबई येथून नुकतेच सदावर्ते यांना सातारा पोलिस ठाण्यात आणले आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घडामोडींना वेग आलेला असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस गाडीतून उतरताना गुणरत्न सदावर्ते यांनी “भारत माता की जय” अशी घोषणा दिली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/554284896055848

मुंबईतील अर्थर रोड कारागृहातून न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आज गुरूवारी सकाळी सातारा पोलिसांनी घेतला होता. सातारा पोलिसांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ताबा घेतल्यानतर 5 वाजता सातारा पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांना घेवून दाखल झाले. यावेळी पोलिस उपअधिक्षक आंचल दलाल, एलसीबीचे अधिकारी किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सातारा पोलिस ठाण्यात कारागृहासमोर असलेल्या चाैकीत गुणरत्न सदावर्ते यांना आणण्यात आले. यावेळी गर्दीला पोलिसांनी पांगविले. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी गाडीतून खाली उतरताच उजवा हात वरती करत मूठ आवळत भारत माता की जय अशी घोषणा दिली. त्यानंतर पोलिसांनी चाैकशीसाठी चाैकीत आत गुणरत्न यांना नेण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यामुळे तणावाचे वातावरण पहायला मिळत होते.