औरंगाबाद – गुंठेवारी अधिनियमानुसार शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी काल दिला.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करत डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून महापालिका गुंठेवारी भागातील मालमत्तांचे प्रस्ताव घेत आहे. गुंठेवारीच्या फाईल तयार करण्यासाठी 52 वास्तुविशारदांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. 1500 चौरस फुटापेक्षा लहान जागेवरील मालमत्ता नियमित करण्यासाठी रेडीरेकनरच्या 50 टक्के शुल्क आकारून बांधकामे नियमित केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यापासून गुंठेवारीच्या फायली स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिकेकडे चार हजार 214 फायली आल्या असून, यातील दोन हजार 37 फायली मंजूर करण्यात आल्या आहेत. फायली दाखल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. दरम्यान पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुंठेवारीचा आढावा घेतला. त्यात मुदतवाढ देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार आता 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढ देण्यात येत असल्याचे पांडेय यांनी सांगितले.
373 मालमत्तांना शेवटची संधी –
गुंठेवारी भागात 373 व्यावसायिक मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांनी बेकायदा बांधकामे नियमित करून घ्यावेत, अशा नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. त्यांना ही शेवटची मुदतवाढ असेल, अशा इशारा पांडेय यांनी दिला.