सांगली । कर्नाटकातील अथणी येथून पुण्याला गुटखा घेऊन चाललेल्या आयशरला मिरज गांधी चौकी पोलिसांनी मिरज-सांगलीरोडवरील हॉटेल राजधानीसमोर सापळा रचून पकडले. यावेळी पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये भुसा ठेवलेल्या पोत्याच्या पाठीमागे 33 लाखांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आढळला. यावेळी पोलिसांनी गुटखा व आयशर ट्रक असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वाहन चालक दाऊल इकबाल मुल्ला, हसन आप्पासाहेब सनदी या दोघांना अटक केली आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालात 25 लाख 20 हजार रुपयांचा हिरा पान मसाल्याचे 105 पाऊच प्रत्येक पाऊचमध्ये 32 पुड्या 200 पोतींमध्ये 21 हजार पाऊस तसेच दुसर्या पांढर्या रंगाच्या प्लास्टीकच्या पोत्यात 6 लाख 30 रुपयांचा रेलॉय 717 सुंगधी तंबाखुचे 105 बॉक्स प्रती बॉक्समध्ये 30 पुड्या असे 200 पोती तसेच 8 लाख 800 रुपयांचा मोठ्या प्लास्टीकच्या बॉक्समध्ये रत्नाछाप तंबाखू तसेच 16 लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक व इतर साहित्य असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आयशरमधून गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु अथणी येथून पुण्याला मिरजेतून जाणार असल्याची माहिती डीबी पथक व गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गांधी चौकी पोलिसांनी नाकाबंदी करून आयशर ट्रक राजधानी हॉटेल समोरून जात असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यास पकडले. यावेळी पोलिसांनी या ट्रकची झाडाझडती घेतली असता ट्रकच्या पाठीमागील बाजूस समोर भुसा भरलेली पोती ठेवली होती. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांना भुसा भरलेल्या पोत्यांच्या मागील बाजूस पांढर्या पोत्यामध्ये गुटखा आढळून आला.