हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नंतर आता नव्याने आलेल्या H3N2 विषाणूमुळे नवं संकट उभं राहिले आहे. देशभरात या विषाणूने थैमान घातलं असतानाच आता महाराष्ट्र्रात सुद्धा या विषाणूने दुसरा बळी घेतला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये या व्हायरसमुळं एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
8 मार्चला ताप सर्दी आल्यामुळे पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबंधित ज्येष्ठ नागरिक अनेक दुर्धर आजाराने ग्रस्त हाेते . त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आता राज्यात H3N2 व्हायरसमुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 3 वर पोचली आहे.
दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या शहरात H3N2 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस H3N2 रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने संपूर्ण राज्याचे टेन्शन वाढले आहे. केंद्र सरकार या विषाणूमुळे अलर्ट मोड मध्ये असून केंद्राकडून देशातील सर्व राज्यांना काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
H3N2 ची लक्षणे काय आहेत?
सर्दी, ताप, खोकला, मळमळ अशी H3N2 ची सामान्य लक्षणे आहेत. परंतु अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास वेळीच सावध होऊन डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका. याशिवाय यावर उपाय म्हणून वारंवार हात स्वच्छ करणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचं आहे.