औरंगाबाद – मराठवाड्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीटही झाली. यामुळे फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मात्र मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. तर परभणी, नांदेड, हिंगोलीसह काही भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील जामगाव शिवारात ऊस काढणीसाठी कन्नड व तिसगाव येथून आलेल्या नऊ कुटुंबांना अवकाळी गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. पाल उडून गेल्याने या कुटुंबाला गारपिटीचा मार सहन करावा लागला. पाला वरील जीवनावश्यक वस्तू अन्नधान्याची नासाडी झाल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच तालुक्यातील सिद्धपुर, जामगाव, कायगाव, भेंडाळा, अमळनेर शिवारात शेतकऱ्यांची धांदल उडाली. गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पैठण तालुक्यातीलही रांजणगाव, दांडगा, लोहगाव, बालानगर, जायकवाडी, टाकळी पैठण, पाचोड, बिडकीन, चितेगाव परिसराला काल दुपारनंतर वादळी वारे व पावसाने झोडपले कन्नड तालुक्यातील पिशोर मध्ये गारपीट झाली. तर परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात रात्री नऊच्या सुमारास मेघगर्जनेसह वीस मिनिटे अवकाळी पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.