हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haji Ali Dargah) मुंबई ही स्वप्न नगरी आहे. इथे अनेक लोक दररोज कामधंद्यासाठी येत असतात. आजवर मुंबईने अनेक लोकांची स्वप्न साकार केली आहेत. याशिवाय मुंबई जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून या ठिकाणी अशी अनेक स्थळे आहेत जी पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. खास करून मुंबईला लाभलेल्या समुद्राच्या अगदी मधोमध असलेल्या ‘हाजी अली दर्गा’विषयी कायमच लोकांना कुतूहल वाटते.
हाजी अली दर्गा (Haji Ali Dargah) हे मुंबईतील अत्यंत पुरातन, ऐतिहासिक वारसा लाभलेले एक अलौकिक स्मारक आहे. जे मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. मात्र, या ठिकाणी सर्व धर्मीय लोक येत असतात. हाजी अली दर्गाविषयी एक चमत्कारिक बाब सांगायची झाली तर, समुद्राच्या मधोमध असूनही या दर्ग्यात आजपर्यंत कधीच पाणी शिरलेले नाही.
चमत्कारिक हाजी अली दर्गा (Haji Ali Dargah)
महालक्ष्मी मंदिरापासून अगदी जवळ समुद्राच्या मधोमध असलेला हाजी अली दर्गा ही वास्तु स्वतःतच एक चमत्कार आहे. इतक्या खोल समुद्राच्या मध्यभागी असूनही आजवर दर्ग्यात पाणी गेलेलं नाही. समुद्रात मोठ मोठ्या लाटा आल्या तरीही समुद्राचं पाणी दर्ग्याच्या आत जाण्याची हिंमत करत नाही.
उदाहरण द्यायचे झाले तर, २६ जुलै २००६ रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला होता. सगळी मुंबई पाण्याने भरली होती. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली होती. मोठ मोठ्या लाटा उसळत होत्या. सगळीकडे नुकसान झाल्याचे दिसून आले. आजही तो २६ जुलैचा पाऊस आठवला मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. असे असताना या पावसात हाजी अली दर्ग्याचे (Haji Ali Dargah) मात्र किंचितही नुकसान झाले नव्हते. यावरून समजते की, हाजी अली दर्गा ही वास्तू खरोखरच अत्यंत अद्भुत आणि तितकीच चमत्कारिक आहे.
पाण्याखाली जाणारी पायवाट
समुद्रात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी बरीच वाढलेली असते. अशावेळी हाजी अली दर्गाकडे जाणारा रस्ता हा समुद्राच्या पाण्याखाली जातो. हा रस्ता सिमेंटचा असून दर्ग्यात जाण्यासाठी आणि दर्ग्यातून बाहेर येण्यासाठी हा एकमेव रस्ता वापरला जातो. मात्र, ज्यावेळी हा रस्ता समुद्राच्या पाण्याखाली जातो तेव्हा दर्ग्याच्या आत असलेले लोक बाहेर येऊ शकत नाहीत. इतकेच नव्हे तर दर्ग्याबाहेर (Haji Ali Dargah) असलेले लोक पुढे आत जाऊ शकत नाहीत. जोपर्यंत हा रस्ता पुन्हा नजरेस पडत नाही तोपर्यंत माणसांची ये- जा होत नाही.
भरती- ओहोटीवेळी समुद्र मर्यादा तोडत नाही
हाजी अली दर्गाबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. त्यात जाणकार लोक सांगतात की, बाबा हाजी अली हे त्यांचे बंधू आणि माता यांच्या परवानगीने मुंबईत वास्तव्यास आले होते. इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी ते ठीक ठिकाणी वास्तव्य करत होते. मात्र, या ठिकाणी इस्लामचा प्रचार करतेवेळी ते कायमचे स्थायिक झाले. हाजी अली दर्गा वा पीर हाजी अली शाह बुखारी यांचे स्मारक आहे. हाजी अली शाह बुखारी यांच्या अदबामुळे आजही भरती-ओहोटीच्या वेळी समुद्र कधीच आपली मर्यादा तोडत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे (Haji Ali Dargah) हा दर्गा मुस्लिम बांधवांसाठी प्रार्थना स्थळ आणि श्रद्धास्थान आहे. अशी मान्यता आहे की, हाजीअली दर्ग्यामध्ये प्रार्थना केल्यानंतर इच्छा पूर्ण होतात. या दर्ग्याची देखभाल सुन्नी गटातील बरेलवी पंथ करतात.
हाजी अली दर्ग्याची भव्यता
माहितीनुसार, हाजी अली दर्गा हा इसवी सन १६३१ मध्ये उभारण्यात आला होता. अर्थात हा दर्गा ६०० वर्षे इतका पुरातन आहे. वरळी येथील समुद्र तटापासून ५०० मीटर आत एका लहनशा बेटावरील खडकावर या दर्ग्याचे बांधकाम केले आहे. सुमारे ४५०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या या दर्ग्याचे बांधकाम ८५ फूट उंचीचे आहे. अत्यंत सुंदर आणि भव्य स्वरूपात बांधलेल्या या दर्ग्याचे बांधकाम पांढराशुभ्र मक्करा संगमरवर वापरून करण्यात आले आहे. (Haji Ali Dargah) हा दर्गा इस्लामिक वास्तुशाहीचा आणि मुघल तसेच इंडोइस्लामिक बांधकाम शैलीचा एक उत्तम दर्जेदार नमुना असल्याचे दिसून येते. तसेच याची भव्यता इतकी आहे की दूरवरून हाजी अली दर्ग्याचे दर्शन घडते.