हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकरणात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. अलीकडेच बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही नेते एका मंचावर दिसले होते. त्याच कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Pawar) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यातही संवाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.
या चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार यांनी आज शरद पवार यांची अचानक भेट घेतली आहे. आज अजित पवार हे घाईघाईत शरद पवारांच्या कार्यालयात दाखल झाले होते. यानंतर त्यांनी ‘प्रेसिडेंट’ असे नाव असलेल्या खोलीत प्रवेश केला. यानंतर ते तब्बल अर्धा तासाने बाहेर आले. म्हणजेच, अजित पवार आणि शरद पवार या दोघांत दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळेच आता सर्वांच्या भुवया पुन्हा राष्ट्रवादीकडे उंचावल्या गेल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले होते. यादरम्यानच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी या दोघांनी एकत्र यावे, यासाठी साकडे घातले होते. आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र दिसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करून शरद पवारांना मोठा धक्का दिला. यानंतर राष्ट्रवादीत चांगलीच फूट पडली. मात्र आता अलीकडेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संवाद वाढल्यामुळे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.