सातारा | सातारा शहरातील एसटी स्टॅण्ड बाहेरील बाजूस काँग्रेस भवनसमोर पानटपरीवर सिगारेट ओढताना संशयित आरोपी मनोज घाडगे याने एकावर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार केला. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयितावर शहर पोलिस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संदीप आनंद मेळाट (वय- 31, रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप मेळाट हे रात्री 9.30 वाजता दुचाकीवरुन काँग्रेस भवनासमोर सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनोज घाडगे याची एका युवकासोबत वादावादी सुरु असताना, तक्रारदार मेळाट हे पानपट्टीतून सिगारेट घेतल्यानंतर तेथेच ते ओढत थांबले होते. काही वेळानंतर मनोज घाडगे व संबंधित युवकांचा वाद मिटला. यानंतर मनोज घाडगे तक्रारदार यांच्याकडे आला व त्याने थेट तक्रारदार यांच्यावर वार केला. ‘तू इथून निघून जा, नाहीतर तलवार पोटात खुपसीन,’ अशी मनोज घाडगे याने दमदाटी केली. या हल्ल्यात तक्रारदार डाव्या कानावर व डोक्याला दुखापत झाली आहे.
संदिप मेळाट हे जखमी अवस्थेत नगरसेवक सुनील काळेकर यांच्याकडे गेले व त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोघांनी शहर पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मनोज घाडगे याच्याविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, ज्या युवकासोबत घाडगे याचा वाद झाला होता तो तक्रारदार मेळाट यांचा साथीदार असावा, याचा गृह करुन वार केला असल्याची शक्यता तक्रारदार यांनी वर्तवली आहे.