पाटण | कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षीही आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी मोजक्याच 100 वारकर्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती. माऊलीच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा मान पाटण गावचे सुपुत्र ह.भ.प. हणमंतराव गुरव यांना मिळाला होता. हणमंतराव गुरव यांचे यंदाचे पायी वारीचे 36 वे वर्ष होते. पायी वारी केल्याबद्दल त्यांचा पाटणचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी सत्कार केला.
हणमंतराव गुरव व त्यांचे सहकारी ह.भ.प.नाथ महाराज मुळगावकर यांचा पाटण तालुक्याच्यावतीने सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अजय कवडे, माजी सरपंच चंद्रकांत मोरे,नगरसेवक सचिन देसाई, माजी ग्रा. प.सदस्य समीर सय्यद, संकपाळ सर,विद्याधर घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनामुळे शासनाने मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे जाण्यास परवानगी दिली होती. तेथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली. या वारीत हणमंतराव गुरव यांना सालाबादप्रमाणे न चुकता माऊलींची सेवा करण्याचे भाग्य लाभले ही पाटण तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.