सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कोयना दौलत निवासस्थानासमोर दिव्यांग नागरिकांनी विविध मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी दिव्यांगानी रस्त्यावरच ठिय्या मांडला.
यावेळी आंदोलनकर्त्या दिव्यांगानी स्वच्छतागृह तसेच इतर शासकीय मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी केली होती. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आंदोलनकर्त्यानी आक्रमक पावित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ पालकमंत्र्यांच्या घरासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अपंगांची समजूत काढून आंदोलकांना जाण्यास सांगितले.
मात्र, आक्रमक झालेल्या दिव्यांग व्यक्तींनी शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच संतापाच्या भरात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर दीव्यांग व्यक्तींनी कपडे काढून मुख्यरस्त्यावर ठिय्या मांडला. दिव्यांगांसाठी स्वच्छ्ता गृहाची असलेली गैरसोय, शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना कामासाठी ताटकळत राहावे लागत असल्याने त्यांना होणारा त्रास तसेच इतर मागण्यांसाठी दिव्यांगानी आक्रमक पावित्र घेतला.