हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याच्याच सावत्र भावाने तब्बल कोट्यवधी रुपयांना चुना लावल्याची बातमी समोर आली आहे. वैभव पांड्या असं या सावत्र भावाचे नाव असून त्याने हार्दिक आणि कृणाल या दोघांचीही फसवणूक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वैभववर हार्दिक- कृणालसोबत व्यवसाय भागीदारीत सुमारे ४.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याबाबत माहिती अशी कि, तीन वर्षांपूर्वी हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघांनी एकत्रितपणे पॉलिमर व्यवसाय सुरु केला होता, त्यामध्ये हार्दिक- कृणालचा वाटा प्रत्येकी 40 टक्के होता तर वैभवने 20 टक्के योगदान आणि सदर व्यवसायाचे व्यवस्थापन करायचे होते. मात्र मात्र, वैभवने आपल्या सावत्र भावांना न सांगता याच व्यवसायात दुसरी फर्म स्थापन करून भागीदारी कराराचा भंग केल्याचा आरोप आहे. वैभवच्या अशा वागण्यामुळे तिन्ही भावांमधील पार्टनरशिप मधील फायदा कमी झाला आणि हार्दिक- कृणाल पांड्याचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झालं. या फसवणुकीनंतर पोलिसांनी वैभव पांड्याला बेड्या ठोठावल्या आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मात्र घरातील भावानेच हार्दिक पांड्याची फसवणूक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, IPL मध्ये हार्दिक पंड्या सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे तर कृणाल पंड्या लखनौ सुपरजायंटकडून आयपीएल खेळत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाची कामगिरी अतिशय सुमार चालली आहे. मुंबईने आत्तापर्यंत फक्तच एकच सामना जिंकला असून हार्दिक पंड्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.