औरंगाबाद प्रतिनिधी । माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांनी अचानक राजकीय सन्यास घेतल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माझी पत्नी इथून पुढे माझी राजकीय वारसदार असेल असं जाधव यांनी व्हिडिओध्ये सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव अनेकदा चर्चेत होते. जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावईदेखील आहेत.
“लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो”. असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/233568413961102/videos/242865453480876/
“प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,” असं जाधव यांनी सांगितलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.