हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने (ED) छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे. विशिष्ट समाजावर कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी हसन मुश्रीफ यांनी केला.
मुश्रीफ म्हणाले की, मी कामानिमित्त बाहेर आहे. दुरध्वनीवरून मला ईडीच्या कारवाईची माहिती मिळाली आहे. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, असं आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
आज सकाळपासून माझ्या घरावर, नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापे टाकल्याचे समजले. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरू आहे. मी काही कामानिमित्त बाहेर आहे. परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी. सरकारी अधिकाऱ्यांनी आपण सहकार्य करावं. कायदा- सुव्यवस्था अडचणीत येईल असं कोणतेही कृत्य करू नका असं आवाहन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना दिले.
यापूर्वी देखील अशाप्रकारचे छापे पडले होते. त्यावेळी सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. तरीही आज पुन्हा का छापा टाकला हे आपल्याला माहित नाही. कोणत्या हेतून ही कारवाई केली हेही कळत नाही. याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करेन मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांतात राखावी असंही मुश्रीफ म्हणाले.
4 दिवसांपूर्वी कागलमधील एका भाजप नेत्याने दिल्लीत जावून माझ्यावर कारवाई कऱण्यासाठी प्रयत्न केले होते. गलिच्छ राजकारणाचा हा प्रकार असून अशा प्रकारच्या कारवाईचा निषेधच झाला पाहिजे. आधी नवाब मालिकांवर कारवाई झाली, आता माझ्यावर होणार आहे आणि किरीट सोमय्या म्हणतात आता अस्लम शेख यांचाही नंबर आहे. म्हणजे विशिष्ट जाती- धर्माच्या लोकांना टार्गेट करण्याचे काम सुरु आहे का अशी शंकाही हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवली.