हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला आहे. मागील 2 महिन्यात त्यांच्यावरील ही तिसरी छापेमारी आहे. यांनतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सारखं सारखं त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला असं म्हणता त्यानी आपली संतप्त भावना व्यक्त केलया. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटेच ईडीचे अधिकारी दाखल झालेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराबाहेर जमा झाले. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं. तसेच या कारवाईवरून आपला संतापही व्यक्त केला. तुम्ही सगळेजण शांत राहा आणि त्यांना (ED ला) सांगा आम्हाला आता गोळ्या मारा असं म्हणताना त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी कार्यकर्त्यांनी सायरा मुश्रीफ यांना धीर दिला. काहीही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत कार्यकर्त्यानी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. हे सगळं धक्कादायक आहे. कितीवेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली जाणार आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच यामागचं अजेंडा आहे असं म्हणत त्यानी या छापेमारीचा निषेध केला आहे.