औरंगाबाद : महिनाभरापुर्वी स्वत:ची दुचाकी चोरीला गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणाने दुस-याची महागडी दुचाकी चोरल्याचा अजबच प्रकार समोर आला आहे. पंधरा दिवसांपासून चोरीच्या दुचाकीवर फिरताना तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी एमआयडीसी वाळुज भागातील ओअॅसिस चौकातून ताब्यात घेतले. योगेश उमाजी नाईक असे त्याचे नाव आहे.
स्वत:ची दुचाकी चोरीला गेल्यामुळे दुस-याची दुचाकी चोरुन वापरत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी योगेश नाईक याला पकडले. नाईकची दुचाकी वाळुज एमआयडीसीतील झलक हॉटेल समोरून २५ डिसेंबर २०२१ रोजी चोरीला गेली होती. त्यामुळे त्याने अनिल दगडू जाधव यांची महागडी दुचाकी चोरली. ही दुचाकी योगेशने स्वत: चोरल्याचे पोलिसांना सांगितले.
दरम्यान, योगेश याला अटक करत पुढील कारवाईसाठी वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार किरण गावंडे, ओमप्रकाश बनकर, नवनाथ खांडेकर, अझहर कुरेशी यांच्या पथकाने केली.