हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला आज होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकेवर आज तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या समोर सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे असेल.
शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई शिवसेनेकडून करण्यात आली. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांनी निवड केली होती. त्यानंतर शिंदे गट कोर्टात गेला होता. आज यावर सुनावणी पार पडणार आहे. खंडपीठ नेमका काय निर्णय देणार?? आमदार अपात्र होतील का? की शिंदे गटाला दिलासा मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारीं यांनी भाजप- शिंदे गटाला सत्तास्थापनेच निमंत्रण दिले होते त्यावर शिवसेनेनं आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली होती. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड, नव्या सरकारने जिंकलेला विश्वासदर्शक ठराव आणि बहुमत सिद्ध करताना बंडखोर आमदारांनी मोडलेला शिवसेनेचा व्हीप अशा विविध याचिकांवर आज तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.