उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. या वाढत्या उष्माघातामुळे एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. लिंबराज सुकाळे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून ते 50 वर्षांचे होते. ते उस्मानाबाद येथील रहिवाशी होते. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही उस्मानाबादमधील पहिलीच घटना आहे.
काय घडले नेमके ?
लिंबराज सुकाळे हे शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिले, पाणी पित असतानाच उष्माघातामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना कळंबमधील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील हसेगाव या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली आहे.
या अगोदर दोघां जणांचा उष्माघाताने मृत्यू
जळगावमध्ये जितेंद्र संजय माळी या शेतकऱ्याचा उष्णाघाताने मृत्यू झाला होता. ते 33 वर्षांचे होते. शेतातून काम करून घरी येत असताना उष्माघातामुळे जितेंद्र संजय माळी यांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात सारकिन्ही येथील समाधान शामराव शिंदे या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. ते 50 वर्षांचे होते.