भाजपने सहा लाख कार्यकर्ते आणले तरी कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच विजय : उदय सामंत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोल्हापूरच्या निवडणूकीत भाजपाने 3 लाखाऐवजी भाजपचे 6 लाख कार्यकर्ते आणले, तरी पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला.

कराड येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर येथील पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या चिन्हावर जयश्री जाधव, तर भाजपच्या तिकीटावर सत्यजीत कदम हे निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा याही निवडणूक रिंगणात आहेत. काॅंग्रेसकडून मिसळ पे चर्चा तर भाजपकडून चाय पे चर्चा निमित्त चांगलाच निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या मतदार संघात तीन लाख मतदार असून भाजप प्रत्येक मतदारांच्या पाठीमागे एक कार्यकर्ता असे तीन लाख कार्यकर्ते येतील असे म्हटले होते, त्यावर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला.

उदय सामंत म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन लाख मतदारांसाठी तीन लाख काय सहा लाख कार्यकर्ते आणले तरी विजय आमचाच होईल. ही काळ्या दगडावरील रेष आहे, अशी खात्री मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.