हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी सकाळी आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बस आणि ट्रकची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर तब्बल 27 जण जखमी झाले आहेत. ही घटना बरोबर आज राष्ट्रीय महामार्ग 37 वरील डेरगाव येथे पाच वाजता घडली आहे. सध्या या घटनेत जखमी झालेल्या सर्व व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या वेळी 45 प्रवाशांनी भरलेली बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने निघाली होती. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची बस बरोबर जोरात धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये ट्रक आणि बस या दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बस मध्ये असणाऱ्या 14 प्रवाशांचा देखील आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमध्ये एकूण 27 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या जखमी झालेल्या सर्व व्यक्तींना डेरगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जेएमसीएच) दाखल केले गेले आहे. दरम्यान, अपघात झालेल्या बसमधील बहुतांश प्रवासी हे भारलुखुवा गावातील होते. यातील बरेच प्रवासी तीनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात जात होते. या प्रवाशांनी पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र या प्रवाशांवर काळाने घाला घातला.