औरंगाबाद – औरंगाबाद शहरात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तब्बल एका महिन्याच्या काळानंतर ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 42.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे वेधशाळेने कळवले आहे.
यावर्षी पावसाने जून आणि जुलै महिन्यात काही दिवस जोरदार हजेरी लावली होती. शहरात 16 जुलै रोजी ढगफुटी च्या वेगाने पाऊस कोसळला होता. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. यादरम्यान उन्हाचा उकाडा हि मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यामुळे पावसाळा नसल्याचे भासवत होते यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. या दरम्यान काल सोमवारी दुपारच्या सुमारास शहरातील बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या आणि रात्री ढगांच्या कडकडाटासह पावसाने पूर्ण शहरात व परिसरात ही हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
शहरातील सेवन हिल, औरंगपुरा, चिकलठाणा, आकाशवाणी, पैठणगेट, गारखेडा, सिटी चौक, सातारा, हर्सूल आदी महत्त्वाच्या भागांमध्ये ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत होते सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली होती.