औरंगाबाद – मागील दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात सुरु असलेल्या धो-धो पावसामुळे जुन्या शहराची तहान भागवणारा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिक आनंदी झाले आहेत. मात्र प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण तलाव बघण्यासाठी व मासे पकडण्यासाठी हौशी बांधवांची मोठी गर्दी होत आहे.
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/582334429478075/
संपूर्ण जुन्या शहराला हर्सूल तलावातून पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे जुन्या शहरातील नागरिक सध्या खुश आहेत. काल झालेल्या पावसाने तलावाच्या साठ्यात मोठी वाढ झाली. एका रात्रीत तलाव ओसंडून वाहत असल्याचे सुखद दृश्य सर्वांना पाहायला मिळत आहे. यामुळे त्याठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन
दरम्यान, तलाव ओसंडून वाहत असतानाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून तलाव परिसरात तौबा गर्दी केली आहे. यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या वतीने तलाव परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.