कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे, ते गोंधळलेले आहेत. भरमसाठ करवाढ करून डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी करवाढ करून महागाई वाढवलेली आहे. आज अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या अर्थिक धोरणामुळे भारत देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आलेली असल्याचे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
तांबवे (ता. कराड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी खास बातचीत केली. तेव्हा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज देशात महागाई, बेरोजगारीसह सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्लाबोल केला. देश चुकीच्या लोकांच्या हातात असून हुकुमशाही पध्दतीने कारभार सुरू असल्याने लोकशाहीला हानीकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. चव्हाण म्हणाले, जे श्रीलंका, पाकिस्तानात, युके आणि बांग्लादेशात झाले. तशी परिस्थिती भारतात येवू नये, यासाठी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. परंतु मोदीची काम करण्याच्या स्टाईलमध्ये चर्चेला, सल्लामसलत आणि विचारविनमयाला करण्याला वाव नाही. संसदेत चर्चा होत नाही, त्यामुळे फार चिंतेचे वातावरण आपल्या देशातही आहे.
देशाची अर्थव्यवस्था अडचणीत :- आज सरकार प्रचंड प्रमाणात कर्ज काढून देश चालवयाचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. परंतु त्यातूनही काही चालेना म्हणून प्रचंड प्रमाणात कर लावत आहे. एवढे करूनही भागत नाही, त्यामुळे आता सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. आता अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.