नवी दिल्ली प्रतिनिधी। हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सुन आणि दिग्गज नेमबाज हीना सिद्धू – पंडित यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्र लिहून एक मागणी केली आहे.
”देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या” अशी विनंती तिनं अमित शाहकडे केली आहे. हिनानं महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर तीव्र नाराजी प्रकट केली आहे. बुधवारी तिनं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली आहे.
दरम्यान हैदराबादमध्ये २७ वर्षीय पशुवैद्यकीय तरुणीवर बलात्कार करून या पीडितीला जाळून तिची हत्या करण्यात आली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याच पार्श्वभूमीवर हीना सिद्धू – पंडित यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली आहे. ”शस्त्र परवाना देणे ही समस्या बनणार नाही. आम्हाला देशात प्रवास करताना, कामावर जाताना सुरक्षित वाटायला हवं. आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.