हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना माझ्या मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
गेल्या ७ दिवसांपासून पीडितेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, सुरू असलेल्या औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तरुणीच्या शरीरातील प्राणवायुचे घटते प्रमाण काळजीची बाब झाली होती. पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी जंतुसंसर्गाशीही झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीपासून पीडितेची प्रकृती अत्यंत खालावली. पीडितेचे ब्लड प्रेशर हळूहळू कमी होत गेल्यानंतर सकाळी तिला दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिली.
हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी जंतुसंसर्गाशीही झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आले होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.