हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या लेकीनं मोठं होऊन आपलं नाव उज्वल करावं, अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मग तो बाप लेकीच्या शिक्षणासाठी काय वाट्टेल ते करतो. अशाच छत्तीसगड येथील एक बापानं आपल्या लेकीसाठी रिक्षा चालवून तिचे शिक्षण केलं. आणि त्या लेकीनही भारत सरकारच्या अग्निपथ योजनेत सहभागी होत इतिहास रचत आपल्या बापाचं नाव मोठं केलं. छत्तीसगडमधील हिशा बघेल या मुलीने अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती 2023 मध्ये भाग घेतला. आणि तिची निवडही झाली. आता हिशा ओडिशातील चिल्का येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे. जाणून घेऊया तिचा प्रेरणादायी प्रवास…
असे झाले हिशाचे शिक्षण
हिशाला शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकाने सांगितले की, गावातील शाळेत शिकल्यानंतर हिशाने उतई कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. जिथून ती पहिली एनसीसी कॅडेट बनली. सरकारने अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर हिशाने अग्निवीर भरती होण्यासाठी तयारी सुरु केली. तिच्या या यशाबद्दल तिचे शिक्षकही आनंद व्यक्त करत आहेत.
अशी झाली अग्निवीरसाठी निवड
मुलीच्या यशाबद्दल बोलताना हिशाची आई सती बघेल म्हणाल्या, “माझ्या धाकट्या मुलीने गावातील मैदानात तरुणांसोबत एकट्याने धावण्याचा सराव सुरू केला. सप्टेंबर 2022 मध्ये तिने अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात भरतीसाठी अर्ज केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी फिटनेस पाहून तिची निवड केली. देशाच्या रक्षणाची शपथ घेऊन सैन्यात भरती होण्याची बरीच तयारी तिने केली. ट्रेनिंगसाठी हिशा पहाटे 4 वाजता उठायची. आणि सराव करायची. कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर हिशाने अग्निवीरमध्ये प्रवेश केला.
वडिलांची कॅन्सरशी झुंज
हिशाचे वडील गेल्या 12 वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी जमिनीसह रिक्षाची विक्री करावी लागली. हालाखीच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून सरकारने आर्थिक मदत करावी;” अशी अपेक्षा सध्या हिशाच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.