औरंगाबाद – विभागीय क्रिडा संकुलातील स्क्वॅशच्या खेळाडूंना धमक्या देणे, मारहाण करण्याचे प्रकार गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत सुरु आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रशांत साठे या नावाच्या व्यक्तीची दहशत पसरली आहे. विनाकारण धमक्या व मारहाण करत असल्यामुळे खेळाडूंनी १७ नोव्हेंबर रोजी उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर देखील साठेने २३ नोव्हेंबर रोजी चपलेने मारहाण केली. दरम्यान, यासंदर्भात आता थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे क्रिडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी सांगितले.
जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने विभागीय क्रिडा संकुलावर १७ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी ठेवण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी विविध भागातील खेळाडू आले. गजानन सिंगल, संदीप डोंगरे, राहुल शिरसाट, प्रतिक सानप, गोरक्ष ढाकणे, दिनेश गाडेकर आणि दिनेश सोनवणे असे खेळाडू स्क्वॅशच्या कोर्टवर खेळत असताना अचानक तेथे आलेल्या प्रशांत साठेने खेळाडूंकडे नाव व पत्ता विचारला. यावर न थांबता त्याने मोबाईलमध्ये खेळाडूंची शुटींग घेऊन त्यांना तुम्ही येथे का खेळता, तुमची मुख्यमंत्री, क्रिडा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच अमरावतीला होणा-या स्पर्धेसाठी खेळायला जाऊ नका, मी पण तेथे येऊन स्पर्धा थांबविणार आहे. तुम्ही माझ्या मोबाईलवर संपर्क साधा, नाही तर तुमचे जीवन उध्दवस्त होईल. तुमच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात येईल. त्यातून वाचायचे असेल तर माझ्या संपर्कात राहा असे धमकावून तो निघून गेला. या संदर्भात खेळाडूंनी क्रिडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याकडे तक्रार केली.
या प्रकारानंतर त्याला मोराळे यांनी बोलावून घेतले. तेव्हा त्याने उपसंचालक मोराळे यांची माफी मागितली. मात्र, त्यानंतर लगेचच त्याने २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ज्ञानेश्वर जनार्दन गुरमे याकडे पास आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर गुरमेने पास असल्याचे सांगताच साठेने त्याला शिवीगाळ व चपलेने मारहाण सुरु केली. कोर्टमध्ये चपला फेकून मारत असताना गुरमे धास्तीने पळू लागला. त्यावेळी त्याला मारहाण करण्यासाठी क्रिडा संकुलाबाहेरपर्यंत तो चप्पल फेकून मारतच होता. या प्रकाराचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.