औरंगाबादमध्ये दोन ठिकाणी होर्डिंग पडून दुर्घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । पुण्यात होर्डिंग पडून झालेल्या जीवितहानीची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही पहिल्याच पावसाने असुरक्षित होर्डिंग चे पितळ उघडे पडले आहे. भव्यदिव्य असलेले हे लोखंडी बॅनर पाऊस-वाऱ्यामुळे ढासळत असून लवकरच याकडे लक्ष दिले गेले नाही तर येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाहिरातीचे होर्डिंग लावून मोठी रक्कम कमविण्यासाठी अनेक जण आपल्या इमारत, हॉटेल,गच्चीवर लोखंडी फ्रेम बसवितात. मात्र अनेक जण होंर्डिंगसाठी फ्रेम्स उभ्या करताना सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नसल्याचं निदर्शनास येत आलं आहे.

रविवारी पहिल्या पावसाच्या सरी औरंगाबाद जिल्ह्यात पडल्या. त्यापूर्वी सोसाट्याचा वारं सुटलं होतं. याच वाऱ्यामध्ये भलेमोठे होर्डिंग पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. जालनारोडवरील एक, तर वैजापूर भागातील एक अशा दोन ठिकाणी होर्डिंग ढासळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने खाली कोणीही नसल्याने जीवित हानी टळली मात्र जिल्हाभरात अजूनही हजारो अशी होर्डिंग लागलेली आहेत. या होर्डिंगच्या धोकादायक बाबींचे सर्वेक्षण होणे आता आवश्यक झाले आहे.

होर्डिंगउभारणीचे सुरक्षाविषयक नियम धाब्यावर बसवून उभे असलेल्या या होर्डींगवर प्रशासन कधी कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे. या सर्वांमधून होर्डिंगउभारणीच्या नियमांची कडक अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.