हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने (Mumbai Rain) वादळ वाऱ्यासह हजेरी लावली आहे. सुरुवातीला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये पावसाळी हजेरी लावली होती. पुढे ठाणे शहर, नवी मुंबई, पालघरमध्ये आहे पाऊस कोसळायला सुरुवात झाली. बघता बघता मुसळधार पावसासह वेगाने वारे वाहू लागले. ज्यामुळे मुंबईत 2 ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग कोसळतानाचे दृश्य कॅमेरातही कैद झाले आहे. ज्यात अनेकजण या होर्डिंग खाली दबले गेल्याचे दिसत आहे.
सर्वात प्रथम मुंबईत वादळी वाऱ्यामुळे वडाळ्यात होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. ही दुर्घटना श्री जी टॉवरजवळ घडली. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस मदतीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून होर्डिंग खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक सेवा ही खोळंबली आहे. तर, मुसळधार पाऊस ही कोसळत असल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
दरम्यान, वडाळ्यातील कोसळलेल्या होर्डिंग खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना
घाटकोपर मध्ये रमाबाई परिसरातही मोठे होर्डिंग कोसळली आहे. हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहिला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, या होर्डिंग खाली 100 पेक्षा जास्त नागरीक आणि वाहने अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने बचाव यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे.