औरंगाबाद – ओमिक्रोन आणि कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहून जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रजा आणि सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एवढेच नव्हे तर शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांची वाढत्या रुग्णसंख्या च्या पार्श्वभूमीवर काल बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. या साथीचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ हाती असावे. यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
याविषयी गटणे म्हणाले की, कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक आणि अनिवार्य बाबी वगळता कोणत्याही स्वरूपाच्या रजा देऊ नयेत, अशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.