सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली, मिरजेसह कुपवाड एमआयडीसी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. तिघांच्या टोळीकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. श्रीशैल राम राजमाने, अनिस अल्ताफ सौदागर आणि अक्षय लक्ष्मण कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांकडून चोरीतील सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही, दोन लॅपटॉप, एक दुचाकी असा एकूण ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुभाषनगर येथील चौक येथे सापळा लावला. बिगर नंबर प्लेट मोटारसायकल वरुन श्रीशैल राजमाने, अनिस सौदागर हे दोघे त्याठिकाणी आले. त्यांना शिताफीने थांबवून झडती घेतली असता, पाठीमागे बसलेल्या अनिस सौदागरच्या सॅकमध्ये दोन डेल कंपनीचे लॅपटॉप एलईडी टिव्ही मिळून आली. हे कोठुन आणले याबाबत विचारले असता त्यांनी माहीती दिली नाही. त्यावेळी श्रीशैल राजमाने याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या ख्रिशामध्ये प्लॅस्टीक पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले व अनिस अल्ताफ सौदागर याच्या अंगझडती मध्ये देखील पॅन्टचे ख्रिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. सोन्याचे दागिने, एलईडी टिव्ही व लॅपटॉपचाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली नाही.
पोउनि दिलीप ढेरे यांनी त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही दोघे व आमचा एक आणखी एक साथीदार अक्षय कांबळे असे तिघांनी मिळून दागीने, एलईडी टिव्ही व लॅपटॉप हे दोन महीन्यापूर्वी जुना मालगाव रोडवरील दत्त कॉलनी येथे रात्री जावुन चोरी केली, दोन महिन्यापूर्वी मिरजेतील अमनगर येथे बंद घरामध्ये दरवाजा तोडून घरफोडी केली तसेच एका महिन्यापूर्वी टाकळी रोडवर असलेल्या जलाराम मंदीराजवळ चोरी केली होती. सदर चोरीतील दागिने, एलईडी टिव्ही व लॅपटॉप आज आम्ही विक्री करण्यासाठी घेवून जात होतो असे सांगीतले. पथकातील कर्मचाऱ्यांनी अक्षय कांबळे याला त्याच्या घरातुन ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असणाऱ्या मोटरसायकल बाबत विचारले असता, श्रीशैल राजामाने याने सदरची मोटरसायकल सहा महिन्यापूर्वी सुभाषनगर जवळून चोरी केली असल्याचे सांगीतले. यावेळी तिघांकडून १ लाख ५८ हजार रुपये किमतीचे चार सोन्याच्या पाटल्या, १ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, ९० हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, ५४ हजार रुपये किमतीचे एक जोड झुबे असलेली सोन्याची कर्णफुले, ६० हजार रुपये किमतीचे डेल कंपनीचे दोन लॅपटॉप, ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही आणि ५० हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी श्रीशैल राजमाने, अनिस सौदागर हे रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांच्यावर मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, विश्रामबाग पोलीस ठाणे येथे घरफोडी व चोरीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.