हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांतील सावळा गोंधळामुळे गृहखाते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा हे खाते चर्चेत आले असून मुंबई आणि ठाण्यातील असलेल्या पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आदेशाला 12 तासात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या खात्याच्या अजब कारभाराबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.
काल मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. तत्पूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक पार पडली. या बैठकीनंतर गृह खात्याने रात्री राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माहिती देण्यात आली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आले होते. परंतु, अवघ्या 12 तासांतच या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली.
स्थगिती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. एका रात्रीत आदेश काढून लगेच सकाळी त्याच आदेशाला स्थगिती देण्यामागचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.
पदोन्नतीला स्थगितीमध्ये ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश
गृहखात्याने पदोन्नतीला स्थगिती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे राज्य गुप्तवार्ता विभागाचे उप आयुक्त राजेंद्र माने, मिरा भाईंदर-वसई-विरारचे पोलीस उप आयुक्त महेश पाटील, महामार्ग सुरक्षा पथक, पुणेचे पोलीस अधिक्षक संजय जाधव, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणेचे अधिकारी पंजाबराव उगले, पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह काही अधिकाऱ्याचा समावेश आहे.