फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात हनी ‘ट्रॅपद्वारेचे एका भेंडी व्यापाऱ्यांचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका पशुखाद्य व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी हनी ट्रॅपद्वारे उकळल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. भेंडी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतीलच संशयित राजू बोके व त्याच्या अन्य चार साथीदारांनीच हा हनी ट्रॅप केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १७ ऑगस्ट २०२० रोजी एका महिलेने गोळी भुस्सा घेण्यासाठी दहा हजार रुपये अॅडव्हान्स द्यायचा आहे. या बहाण्याने पशुखाद्य व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर घेवून त्या व्यापाऱ्याला फोन करून त्यास महाराजा लॉज येथे नेले. लॉजमधील रुममध्ये जाताच महिलेने दरवाजा बंद करून बाथरुममध्ये जाऊन कोणाला तरी फोन केला. यानंतर थोड्या वेळात रुमचा दरवाजा जोरजोरात वाजला. तेव्हा दरवाजा उघडताच राजू बोके व त्याचे चार साथीदार तेथे आले होते. त्यांनी व्यापाऱ्यास लॉजच्या जिन्यातून मारहाण करीत खाली आणले आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवले.
या वेळी कारमध्ये त्या महिलेसह राजू बोके व साथीदार बसलेले होते. त्यांनी व्यापाऱ्यास मारहाण करीत तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार देतो, अशी धमकी देत दमदाटी केली. तसेच पाच लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा व्यापाऱ्याने त्याच्या मित्रांनी गयावया करून हे प्रकरण मिटवून घेण्याची विनंती केली. तरीही त्याच्याकडून जबरदस्तीने दोन लाख रुपये संशयितांनी उकळले आहेत. या प्रकरणातील राजू बोके पूर्वीच पोलिसांच्या ताब्यात असून, त्याचे साथीदार व संबंधित महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.