धक्कदायक! कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरून तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून एका तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना मथुरा टोल नाक्याजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेली तरुणी जागीच ठार झाली. दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. सदर तरुणी आणि तिची आई नोईडावरून शिकोहाबाद येथे उत्तरप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने जात होते. दरम्यान, तरुणी कोरोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तिला मथुरा टोलनाक्याजवळ धावत्या बसमधून तिला फेकून दिले.

मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीची कोविड १९ चाचणी करण्यात आली होती. तिला दिल्लीतून पाठवण्यात आले होते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मुलीला अशक्तपणा आला होता. त्यामुळं तिला चक्कर आली. ती नीट चालू शकत नव्हती. मात्र, ती करोनाबाधित असल्याचा संशय आल्यानं बसचालक आणि कंडक्टरनं तिला धावत्या बसमधून फेकले.’

या घटनेची मथुरा पोलीस चौकशी करत आहेत. तरुणीला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर पीडित तरुणीला एका सामान्य प्रवाशाप्रमाणे उतरवण्यात आलं. कोणत्याही प्रकारची झटापट झाली नाही. तसे पुरावे मिळाले नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

बसमधील इतर प्रवाशांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही
मुलीला धावत्या बसमधून फेकले त्यावेळी तिच्या आईनं तिला वर ओढण्याचे प्रयत्न केले. मात्र, तिला वाचवू शकली नाही. मुलगी खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडत असताना बसमधील इतर प्रवाशांनी तिला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही, असा आरोप मुलीच्या आईनं केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”