हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांत पूर्ण होणार आहे. मात्र या महामार्गावर प्रवास करण्यासाठी नेमका किती टोल द्यावा लागेल याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर टोलचे दरफलक लावण्यात आले आहेत. त्यानुसार जवळपास ७०० किमी अंतर असलेल्या या प्रवासासाठी अंदाजे 1200 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. 2025 पर्यंत हे दर लागू असणार आहेत.चार चाकी वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारणी होणार आहे. समृद्धी महामार्गावर जीप, मोटर, व्हॅन इत्यादी हलक्या मोटर वाहनांसाठी 1.73 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल लागू होणार आहे. तर, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने किंवा मिनी बससाठी 2.79 रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे.
बस, ट्रकसाठी 5.85 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. तसेच तीन आसाच्या व्यावसायिक वाहनांसाठी 6.38 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असेल. याशिवाय अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी 9.18 रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी 11.17 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.