नवी दिल्ली I तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख आहे. या कालावधीपर्यंत तुम्ही दंडासह ITR दाखल करू शकता. मात्र रिटर्न भरताना तुम्हाला तुमच्या कमाईपासून गुंतवणुकीपर्यंतची सर्व माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही सोन्यामध्ये देखील गुंतवणूक केली असेल तर ITR भरताना ते देखील उघड करावे लागेल.
टॅक्स एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, करदात्यांना सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीनुसार टॅक्स भरावा लागतो. गोल्ड बॉण्डद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांवर प्रत्यक्ष सोने खरेदी करणाऱ्यांपेक्षा वेगळे कर दायित्व असेल.
फिजिकल गोल्ड : कॅपिटल गेनच्या हिशेबाने टॅक्स आकारला जाईल
फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यापासून 36 महिन्यांच्या आत त्याची विक्री केल्यास स्लॅब-आधारित शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. सोन्याच्या विक्रीतून मिळणारा रिटर्न गुंतवणूकदाराच्या वार्षिक कमाईमध्ये जोडला जातो. जर तीन वर्षांनंतर सोने विकले गेले तर ते लॉन्ग टर्म कॅपिटल गेन मानले जाईल. यामध्ये विक्रीतून मिळालेल्या रकमेच्या आधारे टॅक्स निश्चित केला जाईल. यावर एकूण मूल्यांकनाच्या 20 टक्के टॅक्स भरावा लागेल. याशिवाय टॅक्सच्या रकमेच्या चार टक्के सेसही लावला जातो.
डिजिटल गोल्ड : 20 टक्के टॅक्स भरावा लागेल
डिजिटल गोल्ड हा सोन्यात गुंतवणुकीचा एक नवीन मार्ग आहे, जो दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. वेगवेगळ्या वॉलेट्स आणि बँक एप्सच्या माध्यमातून यामध्ये गुंतवणूक करणे शक्य आहे. डिजिटल गोल्डमध्ये किमान एक रुपयांची गुंतवणूक करता येते. त्यात रिटर्नवर 20 टक्के टॅक्स आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर 4 टक्के सेस लागू होतो. 36 महिन्यांपेक्षा कमी काळ डिजिटल गोल्ड ठेवल्याच्या रिटर्नवर डायरेक्ट टॅक्स आकारला जात नाही.
गोल्ड ईटीएफ: टॅक्स सह सेस देखील भरावा लागेल
गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) द्वारे देखील सोन्यात गुंतवणूक करता येते. यामध्ये सोने फिजिकल स्वरूपात नसून व्हर्चुअल स्वरूपात आहे. दोन्हीवर फिजिकल गोल्डप्रमाणे समान दराने टॅक्स आकारला जातो. गोल्ड म्युच्युअल फंड किंवा ईटीएफद्वारे सोन्यात गुंतवणूक केल्यास लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्ससाठी 4 टक्के सेससह 20 टक्के टॅक्स लागतो.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड : स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल
सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGBs) वरील गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते, ज्यावर स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. SGB मध्ये 8 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर, गुंतवणूकदाराचा रिटर्न पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. जर होल्डिंग 5 वर्षांनंतर आणि कोणत्याही वेळी मॅच्युरिटी होण्यापूर्वी विकले गेले तर, 20 टक्के लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि 4 टक्के सेस देखील आकारला जातो.