हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मरण कुणालाही चुकलेलं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी मरायचं आहे. पण मेल्यानंतर काय होत याबाबत जिवंतपणीच प्रत्येकाला कुतूहल असतं. सिनेमामध्ये दाखवतात तसं मेल्यानंतर आधी काही क्षण डोळ्यासमोर एक लख्ख प्रकाश पडतो आणि मग पुढे पायऱ्यांचा एक मार्ग दिसतो. असं असेल का मरणानंतरचं जग? आपल्याला काय बुवा माहित नाही. पण समोर आलेल्या एका वृत्तानुसार, एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. मात्र काही मिनिटांतच ती परत जिवंत झाल्याची घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या मृत्यूनंतर आपण २४ मिनिटांनी परत जिवंत झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया.
मेल्यानंतर २४ मिनिटांनी परत जिवंत झाली महिला
एका वृत्तानुसार, लॉरेन कॅनाडे नावाच्या एका महिलेने सोशल मीडिया साईट रेडिटवर तिच्या मृत्यूची गोष्ट सांगितली आहे. यामध्ये तिने सांगितलं आहे की, मागच्या फेब्रुवारी महिन्यात घरात असताना मला कार्डियक अरेस्ट आला. माझ्या नवऱ्याने ९११ क्रमांकावर फोन केला आणि CPR द्यायला सुरूवात केली. डॉक्टरांनी तपासून मला मृत घोषित केले. मात्र, २४ मिनिटांनंतर मी पुन्हा जिवंत झाले. त्यानंतर मला आयसीयूत दाखल केले. MRI मध्ये माझ्या मेंदूचे कोणतेही नुकसान झालेले नाही हे पाहून डॉक्टरांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले’.
महिलेने सांगितला मृत्यूनंतरचा अनुभव
या महिलेने पुढे सांगितले की, ‘त्यावेळी माझ्यासोबत काय घडले ते मला चांगले आठवत आहे. हार्ट अटकनंतर माझ्या पतीने मला ४ मिनिटे सीपीआर दिला. त्यानंतर त्याने ९११ नंबरवर कॉल केला आणि काही वेळाने आपत्कालीन सेवा आली. मात्र, २४ मिनिटांनंतर माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं आणि त्यानंतर मला दवाखान्यात नेले. तोपर्यंत मी कोमात गेले होते. साधारण २ दिवस मी कोमात होते. परंतु, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी खूप गोंधळले होते. बरेच दिवस जुन्या गोष्टी आठवत नव्हत्या. ICU मध्ये माझं काय झालं, तेसुद्धा मला आठवत नाही’.
तो शेवटचा क्षण..
पुढे सांगितले, ‘जेव्हा माझ्या शरीरात जीव नव्हता तेव्हा मला खूप शांत वाटत होतं. कोमातून बाहेर आल्यावर काही आठवडे ही शांतता माझ्यात राहिली. मी दिवस आणि वेळ विसरले होते. मी प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हते. मला हॉस्पिटलमध्ये नेले होते तेसुद्धा मी विसरले. मृत्यू झाला त्यावेळी मला कोणताही प्रकाश किंवा बोगदा दिसला नाही. परंतू, मला शांततेची भावना जाणवली. मला माझ्या ऑफिसमध्ये पडल्यासारखं वाटत होतं. हे विचित्र आहे, परंतु पूर्णपणे सत्य आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मला मृत्यूची भीती वाटत नाही’.