सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
प्रेम संबंधातून पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून सांगलीतील तात्यासाहेब मळा परिसरामध्ये काठीने हल्ला करून गणेश रजपूत या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खून करणाऱ्या आरोपीसह एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका तासाच्या आत पकडले आहे.
गणेश रजपूत हा सेन्ट्रींग काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सहा महिन्यांपूर्वी त्याने प्रेम संबंधातून सचिन हळहट्टे याच्या पत्नीला पळवून नेले होते. पत्नीला पळवून नेल्याचा राग सचिन हळहट्टे याच्या मनामध्ये होता. गेल्या डिसेंबर २०१८ पासून गणेश रजपूत हा बाहेरगावी राहत होता. तो गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सांगलीत आला. त्याला त्याच्या घरच्यांनी व मित्रांनी तू येथून निघून जा तुला काहीजण मारायला टपले आहेत असे सांगितले. तरीही तो न जाता तसाच थांबला. संशयित हल्लेखोर सचिन होळीकट्टी हा गणेशच्या ओळखीचा होता. तो सचिनच्या घरी पत्ते खेळण्यास जात होता. नेहमी ये-जा करत असल्यामुळे गणेशची सचिनच्या पत्नीशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा उचलत गणेशने तिला काही महिन्यापूर्वी पळवून नेले होते. याचा सचिनला राग होता. तो गणेशचा काटा काढायची संधी शोधत होता. परंतु गणेश हा बाहेरगावी राहायला गेल्याने त्याला संधी मिळत नव्हती.
गणेश हा गुरुवारी सांगलीत आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तो सकाळपासूनच त्याच्या मागावर होता. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सचिन व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी गणेशला रिक्षातून पळवून नेले. एकेठिकाणी नेऊन त्याला मारहाण केल्याची चर्चा परिसरात होती. दुपारी त्याला मीरा हाऊसिंग सोसायटीजवळ असणाऱ्या तात्यासाहेब मळा परिसरात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन त्याच्या डोक्यात बाभळीच्या दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शेडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला होता. याठिकाणी खुनासारखी घटना घडल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गणेश रजपूतचा खून झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. गणेशच्या कुटुंबीयांना खुनाची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी येत आक्रोश केला. दम्यान विभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. दरम्यान खून करणाऱ्या संशयित सचिन हळहट्टे यांच्यासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.