मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना ‘ मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं’ असं विधान केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत असं सांगताना माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही असं म्हटलं. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.
“कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, ”या प्रकरणात मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही माझ्या विधानाचा अर्थच समजवून घेत नाही. बोलण्याच्या ओघात डॉक्टरांविषयी शाब्दिक कोटी झाली. यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल तर दूर करावा, मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे,” असेही राऊत यांनी म्हटले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”