नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका रोडरोमिओच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून वाढदिवसादिनीच 19 वर्षांच्या तरुणीने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने अचानक उचललेल्या या पाऊलामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हा आरोपी तरुण तिच्या शेजारीच राहत होता. तो जाता-येता तिची वाट अडवत होता, असा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला आहे. दिल्लीच्या सेंट्रल जिल्ह्यातील आनंद पर्वत पोलिसांनी आत्महत्येसाठी उकसविल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तरुणीने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर पेनाने ‘आय अॅम सॉरी मॉम-डॅड, मोहितने मला असे करण्यास भाग पाडले’; असे लिहिले होते. या तरुणीचे वडील हे बॅटरी रिक्षा चालवितात. त्यांना एक मुलगा आहे. जो 11 वी मध्ये शिकतो. शुक्रवारी प्रीतीचा वाढदिवस होता. पती-पत्नी कामावर निघून गेले. सायंकाळी त्यांच्या मुलाचा फोन आला, ताईने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून आरएमएल हॉस्पिटलला पाठविला.
मृत तरुणीचे नाव प्रीति आहे. प्रीतीच्या वडिलांनी सांगितले कि, दीड वर्षांपूर्वी तिला मोहितसोबत बोलताना पाहिले होते. यामुळे मोहितच्या घरी तक्रार करून दोघांनाही यापुढे न बोलण्यास बजावले होते. मात्र, मोहितने यास नकार दिला होता. प्रीती गल्लीतून जात येत असताना मोहित तिचा रस्ता अडवत होता आणि तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तो तिच्यावर मैत्रीसाठी दबाव टाकत होता. या त्रासाल कंटाळून प्रीतीने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. मोहित छेड काढत असल्याची तक्रार त्याच्या आईकडे अनेकदा करण्यात आली होती. मात्र तरीदेखील तो ऐकतच नव्हता. तो तिला फोन नंबर बदलून बदलून फोन करत होता तसेच बदनाम करण्याची धमकीदेखील देत होता. तीन-चार दिवसांपूर्वी प्रीतीने मोहितला समजवा नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकीसुद्धा दिली होती.