हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच मी जनतेची आणि शेतकऱ्यांची कामे करतो म्हणून मला शिव्याशाप मिळत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी आज राज्याच्या १३ कोटी जनतेला महत्त्वाचा संदेश दिला आहे. ट्विटरवर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करत अजितदादांनी जनतेशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र वासियांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचा अशा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये येणार आहेत. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत. कधी कधी आर्थिक अडचणीमुळे मुलांपेक्षा मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण, लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक आणि सामाजिकदृष्टया सक्षम व्हावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी अशी माझी इच्छा आहे. आमच्या सरकारने अनुभवाच्या जोरावर अशक्य वाटणारे काम शक्य करू दाखवलं आहे.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !#दादाचा_वादा pic.twitter.com/JOlKJZMxYY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2024
राज्यातील मतभगिनी पुरुषांच्या तुलनेत कुठे मागे राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. अर्थसंकल्पात २५ हजार नव्या उद्योगांच्या उभारणीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३० टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना मदत मिळणार आहे. महिलांना पिंक रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. तसेच तरुण-तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि १० हजार ‘स्टाइपेन्ड् देण्यात येणार आहे, अशी माहितीही अजितदादांनी दिली.
वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, विरोधकांमध्ये नकारात्मकता भरली आहे. अनेकजण अकारण टीका करत आहेत, काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरच आवताण सांगितलं आहे परंतु त्यांच्यात आणि तुमच्या दादात हाच फरक आहे. ते राजकारण करतात पण, तुमचा दादा काम करणारा आहे. राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे.मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो. जे लोक बजेटच्या नावाने नाक मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच बघून घ्या, हे तेच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरापर्यंत येऊ द्यायचं नाही, सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.