हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फुले वाड्याला भेट देत राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षण आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना, “छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर मीच काढले” असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसी लढ्याचा जनक मी आहे”
त्याचबरोबर, “येत्या 8 डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषय आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवा. हा मुस्लिमांचा विषय आहे. म्हणून सोडून द्यायचं, असं भाजप सांगत आहे. सरळ प्रश्न आला. सरळ उत्तर येईल. पण मला प्रश्न येईल. तसं मी उत्तर देणार. एकदा बोललो की, बोललेलं विधान मी कधीच मागे घेत नाही. मागे घेणार नाही. राज्यात सध्या दंगली कधीही घडू शकतात” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, “सध्या अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे, कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं. पण हे चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल” असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे 6 डिसेंबर नंतर राज्यात काय घडेल याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे.